वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या नीट-यूजी परीक्षेत अतिरिक्त गुण मिळालेल्या सर्व एक हजार ५६३ विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा आज होणार आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या उच्चस्तरीय समितीच्या अहवालावर सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलेल्या निरीक्षणांच्या आधारे या विद्यार्थ्यांना दिलेले अतिरिक्त गुण रद्द करून फेरपरीक्षेचा निर्णय घेतल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं म्हटलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना फेरपरीक्षा द्यायची नसेल, त्यांना अतिरिक्त गुणांविना मिळालेले गुण ग्राह्य धरले जातील, असंही संस्थेनं स्पष्ट केलं आहे.
नीट परीक्षा पेपरफुटीप्रकरणी दहशतवादविरोधी पथकानं आज पहाटे लातूर जिल्ह्यातल्या दोन शिक्षकांना अटक केली. हे दोघे शिक्षक नीट परीक्षेसाठी खासगी शिकवण्या चालवत होते. त्यांची चौकशी सुरू आहे. तर बिहार पोलिसांनी या प्रकरणातल्या ६ संशयितांना झारखंडमधून अटक केली आहे.
दरम्यान, नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा तपास शिक्षण मंत्रालयानं सीबीआय, अर्थात केंद्रीय गुन्हे अन्वेषण संस्थेकडे सोपवला असून राष्ट्रीय चाचणी संस्थेचे महासंचालक सुबोध कुमार सिंग यांना पदावरून हटवलं आहे. भारतीय व्यापार प्रोत्साहन मंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रदीप सिंग खरोला यांच्याकडे एनटीएच्या महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.