बदलापूर इथं दोन लहान मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणी काल झालेल्या आंदोलनानंतर या भागातली परिस्थिती आणि रेल्वे वाहतूक सुरळीत असून अफवा पसरू नयेत, यासाठी काही दिवस इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी दिली आहे. बदलापूर आणि परिसरातल्या शाळा आज बंद आहेत. रेल रोको आंदोलन करणाऱ्या ३०० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. २८ जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यापैकी २२ जणांना न्यायालयानं १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे. या पार्श्वभूमीवर बदलापूर रेल्वे स्थानक परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याची पोलीस कोठडी न्यायालयानं आज २६ ऑगस्टपर्यंत वाढवली. या प्रकरणाच्या चौकशीसाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी आरती सिंह यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथक नेमण्यात आलं आहे. तर सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्यात येणार आहे. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापिका, तसंच दोन सेविकांना निलंबित करण्यात आलं आहे.