पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, यासाठी सरकार बांधिल आहे. यासंदर्भात विरोधी पक्षानं दिलेल्या सूचनांचा सकारात्मक विचार करेल , असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिलं. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर, माजी अध्यक्ष नाना पटोले आदी सदस्यांनी विधानसभेत ‘नीट’ परीक्षेत झालेल्या गैरप्रकाराचा मुद्दा स्थगन प्रस्तावाद्वारे उपस्थित केला होता. मात्र, अध्यक्षांनी स्थगन फेटाळल्यानंतरही सभागृहात यासंदर्भात पवार यांनी निवेदन दिलं. प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये वाहन चालकांना परवाने देताना होणाऱ्या घोटाळ्यांचा मुद्दा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत उपस्थित केला.
याप्रकरणी योग्य उपाययोजना करण्याची सूचना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला केली. राज्यात विविध ठिकाणी स्फोटक किंवा तत्सम कारखान्यांमध्ये होणाऱ्या स्फोटांचा मुद्दा सभागृहात मांडण्यात आला. या घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना नुकसानभरपाई वाढवून देण्याची मागणी विरोधकांनी केली. या प्रकरणात, आत्तापर्यंत केलेल्या कारवाईची माहिती कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी दिली. दोषींवर कारवाई करू तसंच नुकसानभरपाई वाढवून देण्याबाबत योग्य निर्णय घेऊ, असं आश्वासनही त्यांनी दिलं.