अजिंठा – वेरुळ चित्रपट महोत्सवानं मराठवाड्यातल्या तरुणाईला सिने साक्षर केल्याचं ज्येष्ठ लेखिका, नाटककार, निर्मात्या सई परांजपे यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं दहाव्या अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं काल उद्घाटन झालं. एमजीएम विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात झालेल्या या सोहळ्यात यंदाचा पद्मपाणि जीवनगौरव पुरस्कार परांजपे यांना प्रदान करण्यात आला, त्यानंतर त्या बोलत होत्या.
‘‘आजवर मी केलेल्या कामगिरीची उशीरा का होईना पण दखल घेतली, आणि आज मला हा मोठा सुंदर सन्मान मिळवून दिला, त्याचा मी अतिशय आनंदाने आणि नम्रपणे स्वीकार करते. अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव एका वेगळ्या धारणेनी सुरू झाला. मराठवाड्यामधल्या रसिकांना खास आपला वाटेल, असा हा उत्सव आहे. सांस्कृतिक आणि कलाविषयक उपक्रम केवळ पुण्यामुंबईतच घडू शकतात असं नाही, हे या प्रकल्पानी दाखवून दिलं. मराठवाड्यातल्या तरुणाईला सिनेसाक्षर केलं.’’
सिनेमा हा प्रेक्षकांसाठी असतो, प्रेक्षकांनीही भारतातल्या विविध चित्रपटांची माहिती जाणून घ्यावी, असं आवाहन परांजपे यांनी यावेळी केलं.
दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, चंद्रकांत कुलकर्णी, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुश कदम, अभिनेत्री सीमा विश्वास, महोत्सवाचे संचालक सुनील सुकथनकर, मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
भारतीय सिनेसृष्टीचे संस्थापक दादासाहेब फाळके यांनी १०५ वर्षांपूर्वी दिग्दर्शित केलेल्या ‘कालिया मर्दन’ या प्रसिद्ध मूकपटाचं, या उद्घाटन सोहळ्याआधी विशेष प्रदर्शन करण्यात आलं. येत्या १९ तारखेपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात ६५ राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपटांसोबतच तीन माहितीपट दाखवले जाणार आहेत.