रत्नागिरी विमानतळाच्या नवीन प्रवासी टर्मिनल इमारतीचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. या वेळी रत्नागिरीचे पालकमंत्री आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. रत्नागिरी जिल्हा पर्यटनासाठीचं केंद्र व्हावा यासाठी हे विमानतळ महत्त्वाचं ठरेल, असं प्रतिपादन मुख्यमंत्री शिंद यांनी या वेळी केलं. परदेशी नागरिकांसाठीही हा मार्ग अतिशय महत्त्वाचा आहे. हे लक्षात घेऊन १०० कोटी रुपयांच्या या टर्मिनलचं भूमिपूजन आज संपन्न झाल्याची माहितीही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.
राज्यातल्या सर्व विमानतळांमध्ये हवाईपट्टी परिपूर्ण असली पाहिजे, नाइट लँडिंग सुविधा सगळीकडे असली पाहिजे, यावर भर द्यावा. त्यात काही अडचणी येत असतील, तर त्या दूर करण्यासाठी सरकार प्रयत्न करील,’ अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी या वेळी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या उपाध्यक्ष स्वाती पांडे यांना केल्या.
महाराष्ट्र हे आता उद्योगासाठी मैत्रिपूर्ण वातावरण असलेलं राज्य झालं आहे. दावोसच्या जागतिक आर्थिक फोरममध्ये पाच लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले आणि त्यातले ७० ते ८० टक्के करार अंमलबजावणीच्या टप्प्यापर्यंत आले आहेत. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगारांना १० हजार रुपयांपर्यंत विद्यावेतन देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे. त्यातून कुशल मनुष्यबळ तयार करण्याचा हेतू आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितल्यानुसार, बांबू लागवड आणि त्याच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठीही सरकार शेतकऱ्यांना मदत देत आहे, अशी माहितीही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली. त्यानंतर रत्नागिरीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचं लोकनेते श्यामराव पेजे असं नामकरण आणि इमारतीचं लोकार्पणही आज मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झालं.