राजधानी दिल्ली क्षेत्रातली हवेची गुणवत्ता आणखी घसरली असून आज सकाळी हवेचा गुणवत्ता निर्देशांक 494 अंकांवर गेला होता. केंद्रिय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार काही भागात हा निर्देशांक 500 नोंदवला गेला. यामुळे रेल्वे आणि हवाई वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे.
दरम्यान, राजधानी क्षेत्रातली प्रदूषणाची वाढती पातळी लक्षात घेता दिल्ली आणि दिल्लीच्या सीमेवरील राज्यांनी वर्गीकृत प्रतिसाद कृती आराखड्याच्या चौथ्या टप्प्यासाठीचे निर्बंध लागू करावेत अशी सूचना सर्वोच्च न्यायालयानं केली आहे.
दिल्लीतल्या वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सर्व सरकारी कार्यालयांमध्ये कामकाजाची वेळ वेगवेगळी ठेवण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी असे आदेश नायब राज्यपाल विनाई कुमार सक्सेना यांनी दिल्ली राज्य सरकारला दिले आहेत.
दिल्ली राज्य सरकार आणि दिल्ली महापालिकेच्या सर्व कार्यालयांना हा आदेश लागू असेल. महापालिकेच्या कार्यालयाची वेळ सकाळी साडेआठ ते संध्याकाळी पाच तर राज्य सरकारी कार्यालयांची वेळ सकाळी १० ते संध्याकाळी साडेसहा अशी असेल. पुढच्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत ही व्यवस्था सुरू राहणार आहे.दिल्लीमधे दहावी आणि बारावीसह सर्व शालेय वर्ग आजपासून ऑनलाइन घेण्यात येतील असं मुख्यमंत्री अतीशी यांनी काल जाहीर केलं. महाविद्यालयांचे वर्गही शनिवारपर्यंत ऑनलाइन पद्धतीनं होणार आहेत.आणखी दोन दिवस दिल्ली शहर आणि राजधानी क्षेत्रात रात्री आणि सकाळच्या वेळेत धुरकं तसंच दाट धुकं असेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.