हिवाळ्यातलं उतरलेलं तापमान, कमी झालेला वाऱ्याचा वेग यामुळे नैसर्गिक वायुवीजन कमी होऊन, हवेची गुणवत्ता घसरल्याचं तसंच प्रदुषणातही वाढ झाल्याचं बृहन्मुंबई महानगर पालिकेनं म्हटलं आहे. यासोबतच ऐन थंडीच्या काळातल्या ढगाळ हवामान, वाहनांचं उत्सर्जन आणि बांधकामांच्या ठिकाणी निर्माण होणारी धूळ यामुळेही वायू प्रदूषणात वाढ झाली असल्याचं पालिकेनं म्हटलं आहे.
या प्रदुषणात घट साध्य करण्यासाठी तातडीनं उपाययोजना सुरु केल्या आहेत, त्याअंतर्गत बांधकामांमुळे होणारं प्रदूषण कमी करण्यासाठी २८ मुद्यांची सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केली आहे तसंच सार्वजनिक वाहतूक सेवांच्या विस्तार, शाश्वत नागरी वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासारख्या उपाययोजना राबवल्या जात असल्याचं पालिकेच्या निवेदनात म्हटलं आहे.
मुंबई वायू प्रदूषण शमन आराखड्याची आखणी करून त्याअंतर्गत धूळ शोषण संयंत्रांचा वापर, विविध भट्ट्यांचं स्वच्छ इंधन वापराच्या अनुषंगानं परिवर्तन तसंच घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत विशेष स्वच्छता मोहीमेसारख्या उपाययोजना राबवल्या जात असल्याचंही पालिकेनं म्हटलं आहे.