मुंबई महानगर आणि परिसराचा जीडीपी, अर्थात स्थूल अंतर्गत उत्पादन पाच वर्षांत दुप्पट करण्याचं उद्दिष्ट असून त्यासाठी सात विविध क्षेत्रांवर निती आयोगानं लक्ष केंद्रित केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली. मुंबई महानगर आणि परिसर जागतिक आर्थिक केंद्र बनवण्यासाठी निती आयोगानं केलेल्या अभ्यासाचा अहवाल आज मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
निती आयोगानं केलेल्या अभ्यासात मुंबई महानगरासह पालघर, रायगड, ठाणे या जिल्ह्यांचा समावेश असलेल्या परिसराच्या विकासाचं उद्दिष्ट ठेवलं आहे. सध्या या परिसराचं स्थूल अंतर्गत उत्पादन १२ लाख कोटी रुपये आहे. २०३० पर्यंत ते २६ लाख कोटी रुपये करण्याचं उद्दिष्ट आहे, असं निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही. आर. सुब्रमण्यम यांनी सांगितलं. त्यासाठी मुंबईत ग्लोबल सर्विसेस हब, परवडणाऱ्या घरांना चालना, या परिसराला जागतिक पर्यटन केंद्र बनवणं, परिसरातल्या बंदरांचा एकात्मिक विकास करून उद्योग आणि लॉजिस्टीक हब करणं, सुनियोजित शहरांचा विकास, सर्वसमावेशकता आणि शाश्वतता, तसंच जागतिक दर्जाच्या नागरी पायाभूत सुविधा अशा सात बाबींवर भर देत, आर्थिक वृद्धीचा वेग वाढवला जाणार आहे.
मुंबईत सध्या सुमारे १ कोटी रोजगार असून सुमारे ३० लाख रोजगार अजून निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असं निती आयोगानं अहवालात नमूद केलं आहे.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी निती आयोगासोबत झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि अजित पवारही उपस्थित होते,