एम्स रुग्णालयांमधे रुग्णांची कितीही गर्दी झाली तरी आरोग्यसेवेच्या दर्जाबाबत तडजोड होणार नाही अस केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी आज लोकसभेत सांगितलं. आयुष्मान भारत योजनेअंतर्गात ६२ कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्यांना विमा कवच देण्यात आलं आहे असं त्यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. यात ६ कोटीपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक असून साडेचार कोटी कुटुंबांचा समावेश आहे.
राज्यसभेत समाजवादी पार्टीचे रामजी लाल सुमन यांनी राणा संगा यांच्याविषयी केलेल्या विधानाबद्दल माफी मागावी अशी मागणी सत्ताधारी पक्ष सदस्यांनी केली. राष्ट्राच्या आदर्शांचा अपमान कोणीही करु नये आणि अशा थोर व्यक्तींविषयी बोलताना सदस्यांनी संवेदनशीलता बाळगावी असं अध्यक्ष जगदीप धनखड म्हणाले. इतरांच्या भावना दुखावल्या जातील अशी टिप्पणी कोणीच करु नये असंही ते म्हणाले.
अध्यक्षांनी सांगितलेल्याचं सर्वांनी पालन केलं पाहिजे असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं, आणि सपा खासदाराच्या वक्तव्याचा काँग्रेसने आणि इतर विरोधी पक्षांनी निषेध करावा अशी मागणी त्यांनी केली. देशासाठी लढणाऱ्या प्रत्येकाला आदर दिला पाहिजे, मात्र कायदा हातात घेऊन संबंधित खासदाराच्या घरावर हल्ला करणं योग्य नाही, असं विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. या मुद्यावरुन गदारोळ झाल्यानं सभागृहाचं कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं.