कृषी उत्पादन वाढवण्यासाठी तरुणांनी नवीन तंत्रज्ञान शिकून घ्यायला हवं असं राज्याचे महसूल पशूसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या लोणी इथं कृषी खात्याने आयोजित केलेल्या शिवार फेरी व कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. सेंद्रीय पद्धतीने पिकवलेला कृषीमालाच्या विक्रीसाठी शिर्डीत विक्रीकेंद्र सुरु करता येईल असं ते म्हणाले. कृषी महाविद्यालये आणि संशोधन केंद्रांनी शेतकऱ्याच्या बांधापर्यंत कृषी तंत्रज्ञान पोचवायला हवं असं त्यांनी सांगितलं.
या कार्यक्रमात कृषीविषयक उपक्रमांची तसंच योजनांची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचं प्रकाशन झालं. राहुरी कृषी विद्यापीठ, कृषी विभाग आणि विविध कृषी महाविद्यालयांचे माहिती देणारे स्टॉल तसंच स्थानिक विक्रेत्यांचे स्टॉल लावले होते.