लडाखमधल्या पूर्व भागातल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्त घालण्याबाबत भारत आणि चीन यांच्यात करार झाला आहे. या करारामुळे 2020 पासून निर्माण झालेला दोन्ही देशांमधला तणाव निवळण्याची शक्यता असल्याचं परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री नवी दिल्लीत प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले. दोन्ही देशांमध्ये याबाबत सविस्तर चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला, असंही ते म्हणाले. तसंच, रशियन सैन्यात लढलेल्या भारतीयांच्या परत येण्याविषयीही मिस्री यांनी माहिती दिली. रशियातून 85 भारतीय मायदेशी परतले आहेत आणि जवळपास 20 जण अजूनही तिथेच असून या संदर्भात भारतीय दूतावासाचे अधिकारी रशियाच्या उच्चाधिकाऱ्यांशी संपर्क साधत आहेत, असं ते म्हणाले. दरम्यान भारत -चीन यांच्यात झालेल्या या कराराचं परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉक्टर एस. जयशंकर यांनी स्वागत केलं आहे.