आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीची चर्चा झाली असून संसदेच्या अधिवेशनानंतर जागा वाटपासंबंधीची चर्चा पुढे जाईल, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी आज वार्ताहरांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर अजित पवार यांच्यासोबत गेलेले विधानपरिषदेचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. जे विचारानं आमच्यासमवेत आहेत, त्यांना पक्षात परत घेण्यासंबंधी पक्षाचे नेते निर्णय घेतील, असं पवार म्हणाले.
मराठवाड्यात आरक्षणावरून जे घडत आहे, त्या संदर्भात नव्या पिढीशी सुसंवाद साधण्याची आवश्यकता पवार यांनी व्यक्त केली. आरक्षणाबाबत सरकारने सगळ्यांना एकत्र घेऊन विश्वास निर्माण केला पाहिजे, असंही पवार म्हणाले. शरद पवार यांच्यावरील पुस्तकाचं प्रकाशनही छत्रपती संभाजीनगरमध्ये झालं. यावेळी पवार यांनी मराठवाडा नामविस्तार आंदोलनाच्या आठवणी जागवल्या.