बदलत्या भूराजकीय आणि आर्थिक परिस्थितीत साऱ्या जगाचं लक्ष भारतावर केंद्रीत झालं असून विकसित भारताच्या उद्दिष्टाकडे वाटचाल करणारी धोरणं सरकार राबवत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ॲडवांटेज आसाम या गुंतवणूकदार संमेलनाच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन केल्यानंतर आज गुवाहाटी इथं ते बोलत होते.
कारखाना क्षेत्राची वाढ आणि रोजगारनिर्मिती याकरता आवश्यक पायाभूत सोयी सुविधा आणि उद्योगांना अनुकूल वातावरण देण्यासाठी केंद्रसरकार वचनबद्ध असल्याचं ते म्हणाले. पूर्वेकडच्या देशांबरोबर भारताच्या व्यापारात आसामची भूमिका महत्त्वाची असून विशेषतः सेमीकंडक्टर निर्मितीत आसाम देशाचं नेतृत्व करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मेक इन इंडिया मार्फत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना सरकार प्रोत्साहन देत आहे, असं मोदी म्हणाले. केंद्र आणि आसाम मधल्या भाजपा सरकारने एकत्रितपणे राबवलेल्या विविध विकास योजनांची माहिती त्यांनी दिली.
आसामचे राज्यपाल लक्ष्मणप्रसाद आचार्य, मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, इत्यादी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. अदानी, रिलायन्स आणि टाटा या उद्योगसमूहांच्या प्रमुखांची भाषणं यावेळी झाली. उर्जानिर्मिती, इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर, अन्नप्रक्रीया, आतिथ्य, या क्षेत्रात तसंच स्थानिक कारागीरांच्या कौशल्याला वाव देणारी बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी मोठी गुंतवणूक करण्याच्या घोषणा या उद्योजकांनी केल्या. दोन दिवस चालणाऱ्या या गुंतवणूकदार संमेलनात विविध पातळ्यांवरची एकूण १४ सत्रं होणार आहेत, तसंच २४० हून अधिक उद्योगांची दालनं सादर करण्यात येत आहेत.