वायव्य मुंबई मतदार संघातल्या निकालाला येत्या एक-दोन दिवसांत न्यायालयात आव्हान देणार असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं म्हटलं आहे. अमोल किर्तीकर यांचा पराभव सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून झाल्याचा आरोप करत मुंबईतल्या पत्रकार परिषदेत अनिल परब आणि आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर टीका केली.
या मतदार संघातील मतमोजणी सुरू असताना १८ व्या फेरीपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी प्रत्येक फेरीमधील मतमोजणीची आकडेवारी जाहीर करत होते. परंतु १९ व्या फेरीनंतर ते बंद केल्याचा दावा अनिल परब यांनी केला. मतमोजणी प्रक्रिया सुरू असताना तिथल्या अधिकाऱ्यांना वारंवार कुणाचे फोन येत होते, याची माहिती आपल्याकडे असून ती कोर्टात सादर करू, असंही परब यांनी सांगितलं. दरम्यान, निवडणूक आयोग भाजपच्या नियंत्रणात नसता तर भाजपच्या ४० जागा देखील आल्या नसत्या असा आरोप आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला.