ज्येष्ठ मराठी अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांच्या पार्थिवावर आज पुण्याच्या वैकुंठधाम स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. काल पुण्यात निधन झालं. त्या ८१ वर्षांच्या होत्या. नाटक, चित्रपट, मालिका या सर्व क्षेत्रात आपल्या समर्थ अभिनयानं त्यांनी अनेक दशकं प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. त्यांनी वयाच्या ११व्या वर्षापासून कलाक्षेत्रात काम करायला सुरुवात केली. बेबंदशाही या नाटकातून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केलं. माहेरचा आहेर’, मानाचं कुंकू, कथा, आज झाले मुक्त मी, आईशप्पथ, चिरंजीव, अग्निपरीक्षा, धग, आम्ही दोघे राजाराणी, बाईसाहेब अशा असंख्य चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय ‘कथा अकलेच्या कांद्याची’, ‘राजकारण गेलं चुलीत’, सासूबाईंचं असंच असतं’ अशा अनेक नाटकांमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. सिंघम या हिंदी चित्रपटात ही त्यांनी काम केलं होते. कला क्षेत्रातल्या योगदानाबद्दल दोन वर्षांपूर्वी त्यांना राज्य शासनाच्या नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. देशपांडे यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.