बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्लाप्रकरणी संशयित आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शेहजाद याच्या बोटांचे १९ ठसे सतगुरू शरण इमारतीत पोलिसांना आढळून आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. पायऱ्या, खिडकी आणि अपार्टमेंटमध्ये बोटांचे ठसे आढळले असून हे आरोपीविरुद्ध सबळ पुरावा आहेत असं पोलिसांनी सांगितलं.
सैफ अली खान याच्यावर हल्ला करणारा आरोपी हा भारतात येण्यापूर्वी बांगलादेशात कुस्तीपटू होता. आपण जिल्हा स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये भाग घेतला होता असं आरोपीने पोलिसांनी केलेल्या चौकशीत सांगितलं. आपण कुस्तीपटू असल्याने सैफसोबत झालेल्या झटापटीत आपल्याला कोणतीही इजा झाली नसल्याचा दावा आरोपीने पोलिसांनी केलेल्या चौकशीत केला. सैफच्या घरातून निघाल्यावर अनेकदा कपडे बदलले तसंच अनेक ठिकाणं बदलली असंही त्याने सांगितलं. सैफ अली खानच्या घरी चोरी करण्याआधी आरोपीने शाहरुख खान याच्या घरी चोरी करण्याची आखणी केली होती, मात्र कडक सुरक्षा व्यवस्था असल्याने त्याने हा विचार बदलला असं पोलिसांनी सांगितलं. कासारवडवली इथं सात तास शोधमोहीम राबवून पोलिसांनी आरोपीला अटक केली असं पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी सांगितलं.