चित्रपटसृष्टीतल्या सर्वात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने आज ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा सन्मान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाला. ७०व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात राष्ट्रपतींनी इतरही कलाकार आणि चित्रपटांना सन्मानित केलं. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन आणि इतर यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना राष्ट्रपतींनी दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल मिथुन चक्रवर्ती यांचं अभिनंदन केलं. चित्रपटसृष्टीला त्यांनी दिलेल्या योगदानाचा उल्लेख त्यांनी केला. तसंच, राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेल्या चित्रपटांमुळे समाजात सकारात्मक बदल घडून येतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
अश्विनी वैष्णव यांनी चित्रपट व्यवसायाच्या प्रगतीसाठी सरकार करत असलेली कामं अधोरेखित केली. कौशल्य विकास, पायाभूत सुविधा आणि सुलभीकरणावर सरकार भर देत असल्याचं त्यांनी सांगितलं.
कथाबाह्य चित्रपट विभागात सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार आदिगुंजन या मराठी माहितीपटासाठी सोहिल वैद्य यांना, तर सर्वोत्कृष्ट निवेदनाचा पुरस्कार याच माहितीपटासाठी सुमंत शिंदे यांना देण्यात आला. सर्वोत्कृष्ट कला आणि संस्कृती आधारित चित्रपट म्हणून सचिन सूर्यवंशी यांच्या वारसा या मराठी माहितीपटाला गौरवण्यात आलं. तर आणखी एक मोहेंजोदारो हा मराठी माहितीपट सर्वोत्कृष्ट चरित्रपटात्मक/ऐतिहासिक पुनर्निर्माण/ संकलित चित्रपट ठरला.
कथाधारित चित्रपट विभागात परीक्षक विशेष उल्लेख पुरस्कार गुलमोहर या चित्रपटासाठी मनोज वाजपेयी यांना प्रदान करण्यात आला. कथात्मक चित्रपट विभागात ‘पोन्नियिन सेल्वन भाग १’नं वर्चस्व गाजवलं. ‘तिरुचित्रमबलम’ या चित्रपटासाठी नित्या मेनन आणि ‘कच्छ एक्सप्रेस’ या चित्रपटासाठी मानसी पारेख या दोघींना सर्वोत्कृष्ट नायिका म्हणून गौरवण्यात आलं. ‘कांतारा’ या कन्नड चित्रपटासाठी रिषभ शेट्टी याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. तर ‘ऊँचाई’ या चित्रपटासाठी सूरज बडजात्या यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार राष्ट्रपतींनी प्रदान केला.