भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विन यानं आज ३८व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतला तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिल्यानंतर त्यानं आपण निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. या मालिकेतल्या पहिल्या सामन्यात अश्विननं भारताचं प्रतिनिधीत्व केलं होतं. या सामन्यात त्यानं ५३ धावांत १ गडी बाद केला. हाच त्याच्या कारकिर्दीतला अखेरचा कसोटी क्रिकेट सामना ठरला.
६ नोव्हेंबर २०११ रोजी वेस्ट इंडिजविरोधात दिल्ली इथं झालेल्या कसोटी सामन्यात पदार्पण केल्यानंतर, अश्विननं आतापर्यंत १०६ कसोटी क्रिकेट सामन्यांत भारताचं प्रतिनिधीत्व करत ५३७ बळी घेतले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये अनिल कुंबळे पाठोपाठ भारताच्या वतीनं सर्वाधिक बळी घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. याशिवाय त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये ६ शतकं आणि १४ अर्धशतकंही झळकावली आहेत. त्यानं ११६ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये १५६ तर टी ट्वेंटी सामन्यांमध्ये ७२ बळी घेतले आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही आपण व्यावसायिक टी ट्वेंटी क्रिकेट खेळत राहणार असल्याचं अश्विननं जाहीर केलं आहे.