जम्मू-काश्मीर केंद्र शासित प्रदेशातल्या नवीन सरकारने आज मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर केलं. त्यानुसार,उपमुख्यमंत्री सुरिंदर कुमार चौधरी हे सार्वजनिक बांधकाम, उद्योग आणि वाणिज्य, खाणकाम, कामगार आणि रोजगार, कौशल्य विकास मंत्री असतील. तर सकिना मसूद यांच्याकडे आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण, शालेय तसंच उच्च शिक्षण आणि समाजकल्याण विभागाचा कार्यभार देण्यात आला आहे.
जलशक्ती, वन संधारण आणि पर्यावरण आणि आदिवासी व्यवहार विभाग जावेद अहमद राणा यांच्यावर सोपवण्यात आला आहे. कृषी उत्पादन, ग्रामीण विकास आणि पंचायती राज, सहकार विभागाची जबाबदारी जावेद अहमद दार यांच्याकडे असेल.अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार, वाहतूक, विज्ञान आणि तंत्रज्ञान, युवा आणि क्रीडा तसंच एआरआय आणि प्रशिक्षण मंत्री म्हणून सतीश शर्मा काम पाहतील. याशिवाय ज्या विभागांचं वाटप मंत्र्यांना झालेलं नाही ते सर्व विभाग किंवा विषय हे मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित असतील, असे आदेश नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी दिले आहेत.