गेल्या ३० वर्षांमध्ये पृथ्वीवरची सुमारे ७७ टक्के जमीन विशेषत्वानं कोरडी झाली आहे, असं संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात म्हटलं आहे. यामुळे जगभरातली शेती, जलस्रोत आणि जैव विविधता यांना मोठा धोका पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. १९९० ते २०१५ या कालावधीत वाढलेल्या शुष्कतेमुळे आफ्रिकेनं आपला १२ टक्के जी डी पी गमावला असल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं असून येत्या पाच वर्षांत आफ्रिका सुमारे १६ टक्के तर आशिया सुमारे ७ टक्के जीडीपी गमावून बसेल, अशी भीतीही यात व्यक्त करण्यात आली आहे.
वाळवंटीकरण आणि हवामान बदल या समस्यांचा सामना करण्यासाठी जल व्यवस्थापनाच्या नाविन्यपूर्ण पद्धती तसंच शाश्वत जमीन वापर यांचा अवलंब करण्याची निकड निर्माण झाली आहे, असं मत वैज्ञानिक आणि पर्यावरणवादी यांनी व्यक्त केलं आहे.