सांस्कृतिक मंत्रालयानं आकाशवाणीच्या सहकार्यानं आज नवी दिल्लीत आकाशवाणी भवन इथं ‘हर कंठ में भारत’ हा विशेष शास्त्रीय संगीत कार्यक्रम सुरू केला. हा कार्यक्रम आजपासून १६ फेब्रुवारीपर्यंत दररोज २१ आकाशवाणी केंद्रांवरून सकाळी साडेनऊ ते १० वाजेपर्यंत थेट प्रसारित केला जाईल. या कार्यक्रमात शास्त्रीय संगीतावर आधारित कार्यक्रम होणार आहेत. सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव अरुणिश चावला आणि प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं.
आकाशवाणीच्या महासंचालक डॉ. प्रज्ञा पालीवाल गौर यावेळी उपस्थित होत्या. ‘हर कंठ में भारत’ हा उपक्रम युवा कलाकारांना त्यांची प्रतिभा राष्ट्रासमोर सादर करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करेल, असं अरुणिश चावला यांनी आकाशवाणीशी विशेष संवाद साधताना सांगितलं. सांस्कृतिक मंत्रालयाचा हा एक अनोखा उपक्रम असून त्यामुळे केवळ कलाकारांनाच नव्हे, तर आकाशवाणीलाही श्रोतृवर्ग वाढवण्यासाठी सहाय्यभूत ठरेल, असं आकाशवाणीच्या महासंचालक डॉ. प्रज्ञा पालीवाल गौर यांनी म्हटलं आहे.