विधानसभा निवडणुकीला काँग्रेस – महाविकास आघाडी एकत्र सामोरे जाणार आहेत, असं काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी म्हटलं आहे. ते आज नांदेडमध्ये बातमीदारांशी बोलत होते. विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी प्रदेश काँग्रेसच्यावतीनं आज नांदेडमध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत चेन्नीथला बातमीदारांशी बोलत होते. राज्यातलं महायुती सरकार हे लोकशाही मार्गानं आणि जनतेनं निवडून दिलेलं सरकार नाही तर तोडफोड करून सत्तेवर आलेलं हे सरकार आहे, असं ते म्हणाले.
नांदेडमध्ये आज झालेल्या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार तसंच नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरची एक जागा सोडली तर भाजपा महायुतीच्या विचाराला या जनतेने नापसंती दाखवली आहे, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या वेळी म्हटलं. भाजपानं दुसऱ्यांची घरं फोडली. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसचे घरही फोडले मात्र आता चित्र बदललं असून नांदेडमध्ये अनेकजण काँग्रेस पक्षात प्रवेश घेऊ लागले आहेत, असं ते म्हणाले.
२०१४ साली देवेंद्र फडणवीस यांनीच मराठा, ओबीसी, धनगर समाजाला आरक्षणाचे आश्वासन दिलं होतं , मग १० वर्ष सरकार असताना त्यांनी आरक्षण का दिले नाही, असं ते म्हणाले. जातनिहाय जनगणना करण्याची जाहीर भूमिका राहुल गांधी यांनी घेतली आहे मात्र भाजपा सरकारचा त्याला विरोध आहे, असं ते म्हणाले.
तेलंगणा आणि कर्नाटकातल्या काँग्रेस सरकारनं महालक्ष्मी योजना आधीच सुरु केली आहे. मात्र महायुती सरकारनं निवडणुकीच्या तोंडावर महिलांच्या मतांसाठी लाडकी बहिण योजना आणली असल्याची टीका त्यांनी केली.