केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवीन आयकर विधेयक लोकसभेत मांडलं. विद्यमान आयकर कायदा सोपा आणि सुटसुटीत करण्यासाठी हे नवीन विधेयक सरकारनं सादर केलं आहे. हे विधेयक संसदीय स्थायी समितीकडे पाठवण्याची शिफारस सीतारामन यांनी केली. आगामी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी समितीनं अहवाल सादर करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
नव्या आयकर विधेयकात धोरणात्तम बदल किंवा करांच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात बदल नाहीत. महत्त्वाचं म्हणजे यातून मागील वर्ष, assessment year हे उल्लेख काढून टाकले आहेत. वेतनाच्या संदर्भातल्या सर्व तरतुदी एकाच ठिकाणी घेतलेल्या आहेत. ग्रॅच्युईटी, कपात, निवृत्तीवेतन वगैरेंचा समावेशही वेतनासोबतच आहे. या विधेयकात जुन्या कायद्याच्या तुलनेत २३ परिच्छेद आणि २८३ कलमं कमी आहेत. कायदा लोकांना अधिक सोप्या पद्धतीनं समजावा यासाठी आधीच्या तुलनेत जास्त तक्ते आणि समीकरणं आहेत. TDS/TCS सुलभ होण्यासाठी यासंदर्भातल्या तरतुदी तक्त्यांच्या स्वरुपात दिल्या आहेत. शिवाय स्वयंसेवी संस्थांसाठीच्या तरतुदी सोप्या भाषेत लिहिल्या आहेत. विधेयक तयार करताना सरकारला २१ हजार सूचना प्राप्त झाल्या. त्यातल्या योग्य सूचनांचा समावेश केल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या.