डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

दिल्लीतील युपीएससीच्या तीन परीक्षार्थींच्या मृत्यूप्रकरणाच्या चौकशीसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून समिती स्थापन

दिल्लीच्या राजेंद्र नगर भागात नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करत असलेल्या तीन तरुण विद्यार्थ्यांचा एका कोचिंग वर्गात बुडून मृत्यू झाला. या घटनेची चौकशी करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं समिती स्थापन केली आहे. ही दुर्घटना घडण्या मागची कारणं, त्याला नेमकं कोण जबाबदार आहे, अशा गोष्टींची चौकशी ही समिती करणार असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी करायचे उपाय आणि त्या अनुषंगानं धोरणातील बदलही समिती मार्फत सुचवण्यात येतील. तत्पूर्वी विद्यार्थ्यांच्या मृत्यूचा हा मुद्दा काल संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये उपस्थित करण्यात आला. लोकसभेत भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या सदस्यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली.

 

लोकसभेतील शून्य प्रहरात भाजपच्या बांसुरी स्वराज यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी केंद्रीय गृहमंत्रालयानं चौकशी समिती स्थापन करण्याची मागणी केली. तर, काँग्रेसच्या शशी थरूर यांनी या घटनेची सखोल करण्याची मागणी केली होती. हे कोचिंग वर्ग चालवण्यास ना हरकत प्रमाणपत्रं देणारे अधिकारी या घटनेला जबाबदार असल्याचा आरोप समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादव यांनी केला. राज्यसभेत भाजपच्या डॉक्टर सुधांशु त्रिवेदी यांनी या मुद्द्यावर चर्चेला सुरुवात करत ही घटना म्हणजे गुन्हेगारी स्वरुपाचा निष्काळजीपणा असल्याचं म्हणत शहर प्रशासनानं सांडपाणी व्यवस्थेच्या स्वच्छतेसाठी किती खर्च केला असा सवालही केला. तृणमूल काँग्रेसच्या डेरेक ओब्रायन यांनी घटनेबद्दल चिंता व्यक्त केली.

 

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी चर्चेत हस्तक्षेप करत या प्रकरणात निष्काळजीपणा झाला असून त्याला जबाबदार असलेल्यांनी दोषी धरण्याची गरज व्यक्त केली. दिल्ली सरकारनं विद्यार्थ्यांच्या मृत्यूबद्दल प्रत्येकी एक कोटी रुपयांची भरपाई द्यावी असं आम आदमी पक्षाच्या स्वाती माली वाल म्हणाल्या. दरम्यान , काल दिल्लीत आम आदमी पक्षाच्या मुख्यालयासमोर , दिल्ली भाजप पक्षाच्या वतीनं या दुर्घटनेच्या निषेधार्थ निदर्शनं करण्यात आली. या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आल्याचं दिल्ली पोलिसांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा