पालघर जिल्ह्यात नालासोपाऱ्यामध्ये भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या विरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल झाली आहे. प्रचार संपल्यानंतर मतदारसंघाच्या बाहेरील राजकीय व्यक्तीला तिथे थांबता येत नाही. या नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. तावडे पैसे वाटत असल्याचा व्हिडीओ बहुजन विकास आघाडी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रसिद्ध केला होता. हॉटेलची तपासणी केल्यानंतर निवडणूक यंत्रणेला ९ लाख ९३ हजार ५०० रुपये आणि काही कागदपत्रं सापडली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी दिली आहे.
बविआ कार्यकर्त्यांना गैरसमज झाला आहे. तरीही कुणाचा काही आक्षेप असेल तर निवडणूक आयोगाकडून चौकशी व्हावी असा आपलाही आग्रही आहे, अशी प्रतिक्रिया तावडे यांनी दिली आहे.
विनोद तावडे हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बैठक घेत असताना विरोधकांनी पूर्वनियोजित षडयंत्र करून आरोप केले आणि तावडे यांना गोवण्यात आलं. विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकल्यामुळे हा बदनामीचा कट रचल्याची प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
याप्रकरणी तावडे यांच्या अटकेची मागणी काँग्रेसनं केली आहे. तावडे यांच्याकडे सापडलेली रक्कम नेमकी कुणाच्या तिजोरीतून आली आहे? जनतेचा पैसे लुटून तुमच्याकडे कुणी पाठवला, असा प्रश्न काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी समाज माध्यमावर केला आहे.
आतापर्यंत भाजपाने कशा पद्धतीने सरकारं पाडली त्याचा हा पुरावा आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
नोटबंदी झाल्यानंतरही एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम भाजपाच्या लोकांकडेच कशी येते असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.
पार्टी विथ डिफरन्स अशा बढाया मारणाऱ्या पक्षाचा इतका मोठा नेता पैसे वाटतो, हे अत्यंत धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया बविआ नेते हितेंद्र ठाकूर यांनी दिली आहे.
दरम्यान, डहाणू विधानसभा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीकडून उमेदवारी मिळालेल्या सुरेश पाडवी यांनी मतदानाच्या आदल्या दिवशी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.