नवी दिल्लीत सुरू असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज दुसऱ्या दिवशी वाचक आणि साहित्य रसिकांनी मोठी गर्दी केली होती. तालकटोरा स्टेडियमवर छत्रपती शिवाजी महाराज नगरी इथं भरलेल्या या संमेलनात आज विविध विषयांवर परिसंवाद रंगले.
‘मराठी पाऊल पडते पुढे’ , ‘मनमोकळा संवाद – मराठीचा अमराठी संसार’ या विषयांवरील परिसंवादांना रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभा मंडपात कृष्णात पाटोळे आणि संघानं ‘लोकसाहित्य भूपाळी ते भैरवी’ हा कार्यक्रम सादर केला. यशवंतराव चव्हाण सभामंडपात ‘आनंदी गोपाळ’ या कादंबरीवर परिचर्चा रंगली. ‘बृहन्महाराष्ट्रातील मराठी माणसाचे जीवन आणि साहित्य’ या विषयावर परिसंवाद पार पडला. ‘राजकारणाचे मराठी साहित्यात उमटणारे प्रतिबिंब’ या विषयावर पत्रकार जयदेव डोळे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद झाला. बहुभाषिक कविसंमेलनालाही श्रोत्यांनी दाद दिली. विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी संमेलनस्थळी हजेरी लावली.