भारताची वसुधैव कुटुंबकमची समृद्ध परंपरा जागतिक मानकांचा अंगिकार करण्यास वचनबद्ध असल्याचं केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री डॉक्टर पेम्मासानी चंद्रशेखर यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटनेच्या जागतिक मानक चर्चासत्राच्या समारोप सत्रात ते काल बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारनं तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशातील नागरिकांना जोडण्यासाठी डिजिटल इंडिया अभियानासारखे अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. देशातील सहा लाख म्हणजे जवळपास 95 टक्के खेडी 4G तंत्रज्ञानाद्वारे जोडली गेली आहेत, तसंच दोन लाख गावं आताच ऑप्टिकल फायबरद्वारे जोडण्यात आली असून उर्वरित गावं 2027 पर्यंत जोडली जातील असंही त्यांनी यावेळी सांगितलं.