दिवाळी सणाच्या निमित्ताने प्रवाशांची संख्या वाढल्यानं एसटी महामंडळाला नोव्हेंबर महिन्यात ९४१ कोटी रुपये उत्पन्न मिळालं. हे यंदाच्या वर्षातील सर्वाधिक मासिक उत्पन्न आहे. या महिन्यात एसटीने दररोज सरासरी ६० लाख प्रवाशांनी प्रवास केला. मागील वर्षाच्या याच काळातील उत्पन्नापेक्षा हे उत्पन्न सुमारे २६ कोटी रुपयांनी जास्त आहे. हे विक्रमी उत्पन्न एसटीवरील सर्वसामान्य प्रवाशांच्या विश्वासाचं द्योतक आहे, असं महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांनी सांगितलं. मात्र इंधनाचे वाढते दर, कर्मचाऱ्यांची वेतन वाढ, टायर आणि सुट्या भागांच्या दरामध्ये झालेली वाढ याचा प्रतिकूल परिणाम एसटीचा खर्च वाढीवर झाला असून उत्पन्न आणि खर्चातील ताळमेळ राखण्यासाठी एसटीनं तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेत तसा प्रस्ताव शासनाला पाठविला आहे, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी दिली.