डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

केरळमध्ये वायनाड जिल्ह्यात दरड कोसळून ९३ जणांचा मृत्यू, १२८ जण जखमी

केरळच्या वायनाड जिल्ह्यातल्या मुंडक्काई, अट्टामाला आणि चूरमाला या भागात मुसळधार पावसामुळे आज भूस्खलन झाल्यानं ९३ जणांचा मृत्यू झाला तर १२८ हून अधिक जण जखमी झाले. जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भूस्खलन झालेल्या भागात एनडीआरएफचं पथक, लष्कर तसंच नौदलाचे जवान बचावकार्य करत आहेत. मुंडक्काईच्या डोंगराळ भागातून १५० नागरिकांना वाचवण्यात आलं आहे.

 

चूरमाला इथं नदीवरचा पूल वाहून गेल्यानं दोरीच्या साहाय्यानं अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यात आली. मेप्पडी इथं मदत केंद्र उभारण्यात आलं आहे. दरम्यान, केरळच्या अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना पर्यटन स्थळांवर न जाण्याचं आवाहन केलं आहे.

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही समाज माध्यमावरच्या संदेशातून शोक व्यक्त केला तसंच जखमींच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी कामना केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेविषयी शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपयांची तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केरळमध्ये दोन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे.

 

मृतांपैकी ३४ जणांची ओळख पटली असून १८ मृतदेह कुटुंबांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. वायनाडमध्ये ४५ मदत केंद्र सुरू करण्यात आली असून त्या ३ हजार ६९ नागरिकांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा