डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पश्चिम बंगालमधल्या सिलिगुडीमध्ये रेल्वे अपघातात ९ जणांचा मृत्यू

पश्चिम बंगालच्या न्यु जलपायगुडी स्थानकाजवळ सियालदाहला जाणाऱ्या कांचनजंगा एक्सप्रेसला मालगाडीनं पाठीमागून धडक दिल्यानं झालेल्या भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला असून ३२ जण जखमी झाले आहेत.  मृतांमध्ये ३ रेल्वे कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अपघातग्रस्त ठिकाणीचे बचाव कार्य पूर्ण झालं आहे. प्रथमदर्शनी मालगाडी चालकानं सिग्नलकडे दुर्लक्ष केल्यानं हा अपघात झाल्याचं  निदर्शनास आलं असून अधिक तपासनंतरच अपघाताचं नेमकं कारण समोर येईल, असं रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष जया वर्मा-सिन्हा यांनी सांगितलं.   

 

 

रेल्वे अपघातात जखमी झालेल्यांवर नॉर्थ बंगाल वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात  उपचार सुरू आहेत. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घटनास्थळाची पहाणी केली. त्यानंतर त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.

 

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून जखमींना लवकर बरं वाटावं, अशा सदिच्छा दिल्या आहेत. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून या प्रकरणी रेल्वेमंत्र्यांशी चर्चा केली आहे. या अपघातातल्या मृतांच्या कुटुंबाला प्रधानमंत्री मदत निधीतून २ लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर झाली आहे.

 

रेल्वेकडून मृतांच्या कुटुंबाला १० लाख रुपये, गंभीर जखमींना अडीच लाख रुपये आणि किरकोळ जखमींना ५० हजार रुपये देण्याची घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. अपघातग्रस्त लोकांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी रेल्वेनं वेगवेगळ्या स्थानकांवर मदतकक्ष सुरु केले आहेत. या अपघातामुळं या मार्गावरून धावणाऱ्या  काही रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलले आहेत तर सुमारे १९ गाड्या रद्द केल्याचं रेल्वेनं प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळवलं आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा