डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

संविधानाच्या माध्यमातून देशानं सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक विकासाचं ध्येय साध्य केलं, राष्ट्रपतींचं प्रतिपादन

संविधानाच्या माध्यमातून देशानं सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक विकासाचं ध्येय साध्य केलं, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. संविधान दिनानिमित्त नवी दिल्लीत संविधान सदनाच्या सेंट्रल हॉलमध्ये आयोजित भव्य कार्यक्रमाला त्या संबोधित करत होत्या. आपलं संविधान प्रजासत्ताक व्यवस्थेचा पाया असून नागरिकांचा वैयक्तिक आणि सामाजिक स्वाभिमान सुनिश्चित करण्याचं काम याद्वारे होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात प्रगतीशील आणि सर्वसमावेशक विचारांची पेरणी केली, असं त्या म्हणाल्या.  देशातल्या पायाभूत सुविधांची प्रगती आणि महिला सक्षमीकरणासाठी राबवले जाणारे उपक्रम याबद्दल राष्ट्रपतींनी गौरवोद्गार काढले.

 

उपराष्ट्रपती जगदिप धनखड यांनीही या कार्यक्रमाला संबोधित केलं. गेल्या ७५ वर्षात देशानं आर्थिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. देशाला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळाली आहे, त्यामुळे देशात संविधानाची अंमलबजावणी किती प्रभावीपणे केली गेली हे दिसून येतं असं उपराष्ट्रपती म्हणाले. संविधानाच्या प्रस्तावनेद्वारे प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य, समता आणि न्याय यांची हमी दिली जाते असंही ते म्हणाले.

 

संविधान सभेत विविध विचारधारांचे लोक होते, मात्र त्यांनी एकत्र येत संविधानाची निर्मिती केली. हीच परंपरा आपण सभागृहात पुढे न्यायला हवी, असं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी सांगितलं. स्वातंत्र्यानंतर संसदेच्या माध्यमातून देशात आर्थिक, सामाजिक परिवर्तन घडलं, लोकशाहीच्या तिन्ही स्तंभांनी देशाच्या समग्र विकासात भर टाकली असंही बिर्ला म्हणाले.

 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला देशानं संविधान स्वीकारून ७५ वर्षं झाल्यानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते ७५ रुपयांच्या स्मारक नाण्याचं, तसंच टपाल तिकिटाचं अनावरण करण्यात आलं. संविधानाच्या निर्मितीचा इतिहास आणि प्रक्रिया उलगडून दाखवणाऱ्या दोन पुस्तकांचं आनावरणही यावेळी झालं. तसंच संविधानाच्या संस्कृत आणि मैथिली भाषेतल्या प्रतीही यावेळी प्रकाशित करण्यात  आल्या. त्याआधी संविधान निर्मितीची माहिती देणारी चित्रफित उपस्थितांना दाखवण्यात आली. या कार्यक्रमाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित होते.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा