आंध्रप्रदेशमध्ये तिरुपती इथल्या चेंगराचेंगरीत झालेल्या जीवितहानी बद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. राष्ट्रपतींनी समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्ट मध्ये मृतांच्या कुटुंबीयांप्रति सहवेदना व्यक्त केली आहे, आणि जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना केली आहे.
चेंगराचेंगरीत ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्या प्रति प्रधानमंत्री मोदी यांनी सहवेदना व्यक्त केली आहे. दुर्घटनाग्रस्तांना राज्यसरकार सर्वतोपरी मदत करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
तिरुपती शहरात काल वैकुंठ एकादशीच्या दर्शनासाठी टोकन वाटपाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत सहा भाविक मृत्युमुखी पडले तर अनेक जण जखमी झाले. तिरुपती शहरात टोकन देण्यासाठीच्या कक्षात झालेल्या चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू झाला, तर चाळीस जण जखमी झाले आहेत. तिरुमला तिरुपती देवस्थान समितीनं वैकुंठ एकादशी दर्शनासाठी तिरुपतीमध्ये एक लाख वीस हजार टोकन वाटपासाठी तिरुपतीमध्ये ९५ कक्ष सुरू केले आहेत. त्यातल्या रामानायडू शाळेजवळच्या कक्षामध्ये काल चेंगराचेंगरी झाली. मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे.
नायडू यांनी परिस्थितीचा आढावा घेतल्याचं देवस्थान समितीचे अध्यक्ष बी. आर. नायडू यांनी म्हटलं आहे. चंद्राबाबू नायडू आज दुपारी तिरुपतीला भेट देऊन आढावा घेणार आहेत. दरम्यान या प्रकरणी चौकशी करण्यात येणार आहे आणि योग्य उपाययोजना केल्या जातील असं समितीनं स्पष्ट केलं आहे.A