५५ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव – इफ्फीचा काल गोव्यात समारोप झाला. दिग्दर्शक तथा निर्माते आशुतोष गोवारीकर यांच्या अध्यक्षतेखाली नऊ दिवस चाललेल्या या महोत्सवात ७५ देशांमधले २०० हून अधिक चित्रपट दाखवण्यात आले. समारोप सोहळ्यात ऑस्ट्रेलियातले दिग्गज चित्रपट निर्माते फिलिप नॉय्स यांचा सत्यजीत रे जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. लिथुआनियन चित्रपट टॉक्सिक ने इफ्फीचा सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा सुवर्ण मयूर पुरस्कार पटकावला. नवज्योत बांदिवडेकर यांना ‘घरत गणपती’ या मराठी चित्रपटासाठी भारतीय चित्रपटासाठीचा पदार्पणातला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक; पुरस्कार, मराठी वेब सिरीज ‘लंपन’ला सर्वोत्कृष्ट वेब सिरीजचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यंदाच्या इफ्फिमध्ये प्रतिष्ठित भारतीय दिग्दर्शक रमेश सिप्पी आणि प्रसिद्ध अभिनेत्री जया प्रदा यांचा त्यांच्या चित्रपटसृष्टीतल्या योगदानाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यावेळी उपस्थित होते.