केंद्रीय रसायन आणि खते मंत्री जे.पी. नड्डा यांनी काल नवी दिल्ली इथं वैद्यकीय उपकरण उद्योगाला बळकटी देण्यासाठीच्या उत्पादन निगडित प्रोत्साहन योजनेचं उद्धघाटन केलं. ही योजना देशाला वैद्यकीय उपकरण उद्योग क्षेत्रात स्वावलंबी बनवेल आणि या क्षेत्रासाठी क्रांतीकारी ठरेल, असा विश्वास नड्डा यांनी यावेळी व्यक्त केला. ही नवी योजना 500 कोटी रुपयांची असून, यात वैद्यकीय उपकरण क्लस्टरसाठी सुविधा, क्षमता निर्माण आणि कौशल्य विकास, आयात अवलंबित्व कमी करण्यासाठी योजना, क्लिनिकल अभ्यास कार्यक्रम आणि वैद्यकीय उपकरणांसाठी प्रोत्साहन योजना यावर भर देण्यात येणार आहे, असं सचिव अरुणिश चावला यांनी सांगितलं. ही सर्वसमावेशक योजना असून, यामध्ये या उद्योगासाठी लक्षणीय वाव असल्याचं राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी यावेळी स्पष्ट केलं.