केंद्रीय पंचायत राज मंत्रालयानं 2022-23 या वर्षाकरता राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांसाठी देशभरातून विविध श्रेणींमध्ये 45 पुरस्कार विजेत्यांची निवड जाहीर केली आहे. त्यात महाराष्ट्रातल्या 4 ग्रामपंचायती, 1 पंचायत गट, आणि एक संस्था, यांना 6 पुरस्कार मिळाले आहेत.
यामध्ये सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातल्या मान्याची वाडी ग्रामपंचायतीनं नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार श्रेणीत सर्वोत्तम ग्राम पंचायत पुरस्कार, तसंच ग्राम उर्जा स्वराज विशेष ग्राम पंचायत अशा दोन पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं.
गोंदिया जिल्ह्यातल्या तिरोडा पंचायत गटाला नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार श्रेणीत सर्वोत्तम पंचायत गट हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी गट अंतर्गत मोडाळे ग्रामपंचायतीला दीनदयाळ उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्कार श्रेणीत स्वच्छ आणि हरित ग्राम पंचायत हा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे
भंडारा जिल्ह्यातल्या बेला ग्रामपंचायतीनं कार्बन न्यूट्रल विशेष पंचायत श्रेणीत तृतीय क्रमांकाचा पुरस्कार पटकावला आहे.
तर पुण्यातल्या यशदा, अर्थात यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी या संस्थेला पंचायत क्षमता निर्माण सर्वोत्तम संस्था श्रेणीत तृतीय क्रमांचाचा पुरस्कार मिळाला आहे.
येत्या बुधवारी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान केले जातील.