महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठीचं चित्र स्पष्ट झालं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी ४ हजार १४० उमेदवार रिंगणात आहेत. राज्यातल्या २८८ मतदारसंघात ७ हजार ७८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते; उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कालच्या शेवटच्या दिवसापर्यंत २ हजार ९३८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.
अनेक मतदार संघातली बंडखोरी रोखण्यात महायुती आणि महाविकास आघाडीला यश आलं आहे; त्याचवेळी अनेक ठिकाणी बंडखोर उमेदवारांनी आपले अर्ज कायम ठेवल्याने तिथे चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मित्रपक्षांचे उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असल्याने प्रचाराच्या बाबतीत संभ्रमाचं वातावरण निर्णाण झालं आहे.
भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि दक्षिण पश्चिम नागपूरचे उमेदवार देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रचाराचा नारळ फोडला. त्यांनी आज जनसंपर्क रॅलीच्या मध्यमातून पेट्रोल पंप चौक हिंगणा नाका इथून प्रचाराला सुरवात केली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा आज यवतमाळ जिल्ह्यातील वणी आणि राळेगाव मतदारसंघातील उमेदवारांसाठी होणार आहे.