केंद्र सरकारनं 2025-26 या विपणन वर्षासाठी कच्च्या तागाच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कच्च्या तागासाठी प्रति क्विंटल पाच हजार 650 रुपये दिली जाणार असून ती गेल्या वर्षीच्या तुलनेत 315 अधिक असल्याची माहिती काल दिल्लीत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर दिली. सरकारच्या या निर्णयाचा फायदा 40 लाख ताग उत्पादक कुटुंबाना होणार आहे. कच्च्या तागाच्या किमान आधारभूत किंमतीत सहा टक्के वाढ केली असून ती उत्पादन खर्चापेक्षा साधारण 67 टक्के अधिक असल्याचं गोयल म्हणाले.
राष्ट्रीय आरोग्य मोहीम पुढील वर्षीपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय मंत्रीमंडळानं घेतला. गेल्या तीन वर्षात माता बाल आरोग्य, रोगनिर्मूलन आणि आरोग्य काळजीमध्ये सुधारणा होऊन विविध क्षेत्रात महत्त्वाची प्रगती केली असल्याचं सांगून उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी देशभरात 1990 नंतर मातामृत्युदरात 83 टक्के घट झाली असल्याची माहिती दिली. क्षय रुग्णांमध्येही घट झाल्याचं सांगून दर एक लाख लोकसंख्येमागे 2023 मध्ये 195 क्षयरोगी आढळले, तर या आजाराचा मृत्युदरही 28 पासून 22 टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे अशी माहिती गोयल यांनी दिली.