दृढनिश्चय आणि सातत्यपूर्ण प्रयत्न हे यशाचं गमक असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केलं. उत्तराखंड इथे आयोजित ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या समारोप समारंभावेळी ते बोलत होते. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांनी उत्तराखंडचं अभिनंदन केलं, तसंच ग्रीन गेम्स या उपक्रमाचं कौतुकही केलं. २०३६च्या ऑलिंपिक खेळांचं आयोजन करण्यासाठी भारत आता पूर्णपणे तयार असल्याचं शहा यांनी यावेळी सांगितलं. यंदाच्या अर्थसंकल्पात क्रीडा क्षेत्रासाठी ३ हजार ८०० कोटींची तरतूद केल्याचंही ते म्हणाले.
या समारंभात भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षा पी. टी. उषा यांनी या स्पर्धेच्या समारोपाची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर अमित शहा यांनी मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांना या स्पर्धेचा ध्वज सुपूर्द केला. ३९व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन मेघालयात होणार आहे.
या स्पर्धेत महाराष्ट्राने सर्वाधिक २०१ पदं पटकावली असून त्यात ५४ सुवर्ण, ७१ रौप्य आणि ७६ कांस्य पदकांचा समावेश आहे. पदकतालिकेत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर असून सेना दलं ६८ सुवर्णपदकांसह पहिल्या तर हरयाणा ४८ सुवर्णपदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे.