३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा समारोप उत्तराखंडमधल्या हल्दवानी इथं आज होत आहे. दुपारी होणाऱ्या समारोप समारंभात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत.
केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी, केंद्रीय क्रीडा आणि युवा कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे आणि ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष पी. टी. उषा यांची या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती असेल.
यंदाच्या क्रीडा स्पर्धेत देशभरातल्या खेळाडूंनी १ हजार ५२३ पदकांची लयलूट केली. यात ४५७ सुवर्ण, ४५५ रौप्य आणि ६११ कांस्य पदकांचा समावेश आहे.
पदकतालिकेत सेना दल संघ पहिल्या क्रमांकावर आहे. ६८ सुवर्ण, २६ रौप्य आणि २७ कांस्य पदकांसह त्यांनी एकूण १२१ पदकं जिंकली आहेत. महाराष्ट्राने सर्वात जास्त १९८ पदकं जिंकली आहेत, यात ५४ सुवर्ण, ७१ रौप्य आणि ७३ कांस्य पदकांचा समावेश आहे. हरियाणा ४८ सुवर्ण, ४७ रौप्य आणि ५८ कांस्य पदकांसह एकूण १५३ पदकं जिंकून तिसऱ्या क्रमांकावर आहे.