ई-गव्हर्नन्स हा विकासाचा एक मूलभूत घटक असून तो सरकारला अधिक जबाबदार, सर्वसमावेशक आणि नागरिक केंद्रित बनण्यासाठी सहायक असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत आयोजित ई-गव्हर्नन्स या विषयावरच्या २७व्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन करताना बोलत होते. ‘विकसित भारत-सुरक्षित आणि शाश्वत ई-सेवा वितरण’ ही या परिषदेची संकल्पना आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
ई-गव्हर्नन्स हे फक्त तंत्रज्ञान नसून लोकांची विचार प्रवृत्ती बदलण्याचं माध्यम आहे. यामधल्या पारदर्शकतेमुळे सामान्य नागरिकांचा प्रशासनावरचा विश्वास वाढत असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेच्या पहिल्या दोन हप्त्याची रक्कम अतिशय कमी वेळेत थेट लाभार्थ्यांच्या खात्यात केवळ ई गव्हर्नन्समुळे शक्य झाल्याचं त्यांनी सांगितलं.
ई गव्हर्नन्स हे सुशासनाचं मूलभूत तत्व असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या संभाव्यतेवरही त्यांनी चर्चा केली. राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार 2024 विजेत्यांचा उपमुख्यमंत्री फडनवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.