कारगिलमध्ये आपण केवळ युद्ध जिंकलं नाही, तर सत्य, संयम आणि सामर्थ्याचं अतुलनीय उदाहरण जगापुढे ठेवलं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
२५ व्या कारगिल विजय दिना निमित्त, प्रधानमंत्री मोदी यांनी आज लडाख मधल्या कारगिल युद्ध स्मारकाला भेट दिली आणि कारगिल युद्धात कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानांना त्यांनी आदरांजली वाहिली. त्यावेळी ते बोलत होते. आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी महत्वाचा असून, देशाचं रक्षण करणाऱ्या सर्वांना आदरांजली वाहण्याचा हा दिवस असल्याचं त्यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे.
भारत शांतता राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असताना, पाकिस्ताननं केलेल्या फसवणुकीचा उल्लेख करत, कारगिल युद्धात असत्य आणि दहशतीला, सत्यापुढे हार पत्करावी लागल्याचं ते म्हणाले.
दहशतवादाविरोधात निषेध नोंदवत, पाकिस्ताननं भूतकाळातून कोणताही बोध घेतला नसल्याचं ते म्हणाले.
पंतप्रधानांनी आज दूरस्थ पद्धतीनं लडाख मधल्या शिंकुन-ला बोगदा प्रकल्पाचा पहिला सुरुंग स्फोटही केला. निमू – पदुम – दारचा मार्गावर, जवळजवळ १५ हजार ८०० फूट उंचीवर बांधला जाणारा हा दुहेरी बोगदा वर्षभर लडाख या प्रदेशाबरोबर संपर्क प्रस्थापित करण्यासाठी महत्वाचा ठरेल.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कारगिल विजय दिना निमित्त देशाच्या सशस्त्र बलांप्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे आणि त्यांना आदरांजली वाहिली आहे. त्यांचं बलिदान आणि शौर्य देशाच्या प्रत्येक नागरिकाला प्रेरणा देईल असं त्यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे.
गृहमंत्री अमित शाह यांनी कारगिल विजय दिना निमित्त लष्कराच्या वीर जवानांच्या शौर्याला अभिवादन केलं आहे. कारगिलमध्ये तिरंगा ध्वज फडकावून या जवानांनी देशाचा गौरव वाढवल्याचं त्यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे.
कारगिल युद्धात देशाच्या भूभागाचं रक्षण करण्यासाठी अत्यंत कठीण परिस्थितीत आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या वीर जवानांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अदांजली वाहिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि अजित पवार यांनी कारगिल विजय दिना निमित्त आज कारगिल युद्धात आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या शूर सैनिकांना अभिवादन केलं आणि त्यांना आदरांजली वाहिली.