दहशतवाद, फुटीरतावाद आणि उग्रवाद ही जगासमोरची मुख्यं आव्हानं असून, कट्टरता आणि दहशतवादाच्या मार्गानं कोणताही देश प्रगती करू शकत नाही, असा स्पष्ट इशारा परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानच्या भूमीवरून दिला आहे. ते आज इस्लामाबाद इथं तेवीसाव्या शांघाय सहकार्य संघटना अर्थात एससीओच्या परिषदेला संबोधित करत होते. सीमेपलिकडून दहशतवाद होत असताना व्यापाराला प्रोत्साहन देता येत नाही, असंही परराष्ट्रमंत्र्यांनी बजावलं. भारतीय परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानला भेट देण्याची ही गेल्या नऊ वर्षातली पहिलीच वेळ आहे. दरम्यान, जयशंकर यांनी आज सकाळी, एक पेड मां के नाम या उपक्रमाचा एक भाग म्हणून इस्लामाबादच्या भारतीय उच्चायुक्त कार्यालयात अर्जुन वृक्षाचं रोप लावलं.
Site Admin | October 16, 2024 3:28 PM | Council of Heads | EAM Dr S Jaishankar