पुण्यात गुईलेंन बॅरे सिंड्रोमचे २२ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. ज्या भागात हे रुग्ण आढळले आहेत, त्या भागात पथक दाखल होणार आहे. गुईलेंन बॅरे सिंड्रोम हा एक मज्जासंस्थेसंबंधीचा विकार आहे. हा आजार दुर्मिळ असला तरीही धोकादायक नसल्याची माहिती पुणे आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. पुणे शहरातील ६ आणि इतर १६ रुग्ण हे पुणे जिल्ह्यातील आहेत.
हा आजार संसर्गजन्य नसल्याचं महापालिका आरोग्य प्रमुख नीना बोराडे यांनी म्हटलं आहे. दरम्यान सिंहगड रस्ता परिसरातील पाण्याची तपासणी करून हा आजार दूषित पाण्यामुळे झाला आहे किंवा नाही तपासले जाईल असं महापालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी म्हटलं आहे.
रुग्णांकडून जुलाब, ताप आणि अशक्तपणासारख्या तक्रारी केल्या जात आहेत. या रुग्णांना गुईलेन बॅरे सिंड्रोमची लागण झाल्याचं दिसून आल्याची माहिती खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली आहे. याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत ते आज पत्रकारांशी बोलत होते.
उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालेले रुग्ण धायरी, सिंहगड रोड आणि किरकटवाडी परिसरातले आहेत. यातील १६ पैकी ८ रुग्णांना व्हेंटिलेटर अर्थात जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आलं आहे.