डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

नौदलाच्या २ नौका आणि एका पाणबुडीचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रार्पण

भारत विस्तारवाद नाही, तर विकासवादाच्या दिशेनं काम करत आहे. भारतानं खुल्या, सुरक्षित, समावेशक आणि समृद्ध भारत-प्रशांत क्षेत्राचं नेहमीच समर्थन केलं आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.  ते आज मुंबईत नौदलाच्या गोदीत सुरत आणि नीलगिरी या युद्धनौका, तसंच वाघशीर ही पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट केल्यानंतर बोलत होते. नौदलाच्या ताफ्यात एकाच वेळी एकापेक्षा अधिक युद्धनौका आणि पाणबुडी समाविष्ट होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळं भारताची सुरक्षा आणि प्रगतीला नवीन सामर्थ्य मिळेल असं ते म्हणाले. 

 

छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतात नौदलाची स्थापना केली, त्याच पवित्र भूमीवर २१व्या शतकात नौदलाला बळकटी देण्याच्या दिशेनं हे खूप मोठं पाऊल असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं. गेल्या १० वर्षांत भारताच्या तिन्ही सशस्त्र दलांनी आत्मनिर्भरतेचा मंत्र अवलंबला आहे, त्याचं त्यांनी कौतुक केलं. सर्वांच्या सहकार्यानं लवकरच संरक्षण क्षेत्राचा कायापालट होईल, संकटकाळात इतर देशांवरचं भारताचं अवलंबित्व कमी करणं, रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करणं यामुळे शक्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

 

वाढवण बंदराला मंजुरी, सीमावर्ती भागांमध्ये वाढती जोडणी, भारतमाला योजना, व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रमाचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला. भविष्यात अवकाश आणि खोल समुद्र या दोन क्षेत्रांचं महत्त्व खूप वाढणार असून त्या क्षेत्रात भारताची ताकद वाढवण्याचं काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.

 

भारत-प्रशांत क्षेत्र भारतासाठी ऐतिहासिक काळापासून महत्त्वाचं आहे, त्यामुळे या क्षेत्रात सशक्त नौदल असण्याला देशाच्या दृष्टीनं मोठं प्राधान्य आहे. ते साध्य करण्याच्या दृष्टीनं या तीन नौकांचा नौदलात समावेश हा महत्वाचा टप्पा असल्याचं प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केलं.

 

भारतीय नौदलाच्या वेगवान कामामुळेच भारत-प्रशांत क्षेत्रातली सागरी सुरक्षा कायम ठेवण्यात यश आलं आहे, असं नौदल प्रमुख डमिरल दिनेश कुमार त्रिपाठी म्हणाले. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा