स्वित्झर्लंडमध्ये दावोस इथं सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक परिषदेत महाराष्ट्रानं दोन दिवसांत १५ लाख ७० हजार कोटी रुपयांच्या ५४ सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विविध उद्योगसमूहांशी बैठकीचं सत्र सुरू ठेवलं होतं. या करारांमुळं अंदाजे १६ लाख रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे. त्यापैकी एक महत्त्वाचा करार एमएसएन होल्डिंग्ज लिमिटेडसोबत झाला असून, त्यात राज्याच्या ‘अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट’ उपक्रमांतर्गतच्या प्रगत लिथियम बॅटरी आणि सेल उत्पादन प्रकल्प स्थापन करण्याच्या योजनेचा समावेश आहे.
यामुळे विदर्भाच्या विकासावर लक्ष केंद्रीत करून ८ हजार ७६० प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती करण्याचा उद्देश आहे. रिलायन्स कंपनीबरोबर झालेल्या करारामुळे पेट्रोरसायनं, पॉलिस्टर, अक्षय ऊर्जा, जैवऊर्जा, हरित हायड्रोजन, आदरातिथ्य आणि स्थावर मालमत्ता इत्यादी उद्योग क्षेत्रात ३ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक होण्याची अपेक्षा आहे. तर ॲमेझॉन कंपनी देखील महाराष्ट्रात ७१ हजार ७९५ कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक करणार असून त्यातून ८३ हजार १०० रोजगारांची निर्मिती होणार आहे.
गेल्या दोन दिवसांत झालेल्या करारांमधून राज्याच्या सर्व भागात गुंतवणूक केली जात असून त्यामुळे समतोल विकासाचा उद्देश साध्य होईल असं चित्र निर्माण झालं आहे. राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलर्स करण्याचे उद्दीष्ट साध्य करण्यावर मुख्यमंत्र्यांनी भर दिला आहे.
याशिवाय ह्युंदाई, डीपी वर्ल्ड, सिस्को, ब्रिटनचे माजी प्रधानमंत्री टोनी ब्लेअर, एन. टी. टी. डाटा या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काल चर्चा केली. या कंपन्यांही राज्यात गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक आहेत.