आयुष्मान भारत-पंतप्रधान जन आरोग्य योजनेंतर्गत या महिन्याच्या 25 तारखेपर्यंत 70 किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सुमारे 14 लाख आयुष्मान वय वंदना कार्ड जारी करण्यात आल्याचं केंद्र सरकारनं म्हंटलं आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी काल लोकसभेत एका लेखी उत्तरात सांगितलं की, या योजनेत आता 70 वर्षं किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील कोणत्याही सामाजिक-आर्थिक स्थितीतील ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी 5 लाखांपर्यंत मोफत उपचार दिले जातात. या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबांची संख्या सुमारे साडेचार कोटी असून सुमारे 6 कोटी व्यक्तींचा यात समावेश आहे. 13 हजार 173 खासगी रुग्णालयांसह एकंदर 29 हजार 870 रुग्णालये या योजनेत समाविष्ट असून या योजनेअंतर्गत जनरल मेडिसिन, सर्जरी, ऑर्थोपेडिक, कार्डिओलॉजी आणि ऑन्कोलॉजीसह 27 प्रकारच्या वैद्यकीय शाखांमध्ये विविध प्रकारच्या 1961 प्रक्रियांसाठी कॅशलेस आरोग्य सेवांचा समावेश आहे.