छत्तीसगढमधील बीजापूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत काल 31 नक्षलवादी ठार झाले आणि 2 जवान शहीद झाले. बीजापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यानाच्या जंगलात मोठ्या संख्येने नक्षलवादी उपस्थित असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर जिल्हा राखीव दल, विशेष कार्य दल आणि बस्तर फायटर यांच्या संयुक्त पथकानं शोधमोहिम राबवून ही कारवाई केल्याचं बीजापूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ. जितेंद्र यादव यांनी सांगितलं.
घटनास्थळावरून एके-47, सेल्फ-लोडिंग आणि इन्सास रायफल्ससह बॅरल ग्रेनेड लाँचर आणि इतर शस्त्रे आणि स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. या घटनेसंदर्भात केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी, सुरक्षा दलांनी केलेली ही कामगिरी म्हणजे भारताला नक्षलवादमुक्त करण्याच्या दिशेनं मोठं यश आहे अशी प्रतिक्रिया समाजमाध्यमावरून व्यक्त केली आहे.
या संदेशात त्यांनी चकमकीत वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबियांप्रती त्यांनी सहवेदना व्यक्त केली आहे. देश या दोन वीर जवानांचा सदैव ऋणी राहील, असंही शहा यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.