स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस, अग्निशमन, होमगार्ड, नागरी सुरक्षा आणि सुधारणा सेवेच्या एकंदर १ हजार ३७ कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकांची घोषणा करण्यात आली आहे. तेलंगण पोलीस दलाचे मुख्य कॉन्स्टेबल चडूवू यादय्या यांना राष्ट्रपती शौर्यपदक जाहीर झालं आहे. २१३ कर्मचाऱ्यांना शौर्यपदक, तर ९४ जणांना विशेष सेवेसाठी राष्ट्रपती पदकानं सन्मानित करण्यात येत आहे. यापैकी ७५ कर्मचारी पोलीस सेवेतले, ८ अग्निशमन सेवेतले, ८ नागरी सुरक्षा आणि होम गार्ड सेवेतले, तर ३ सुधारणा सेवेतले कर्मचारी आहेत. यामध्ये राज्यातल्या चिरंजीव राम छेबीला प्रसाद, राजेंद्र डहाळे, सतीश गोवेकर यांचा समावेश आहे.
७२९ जणांना प्रशंसनीय सेवेसाठी पदकं जाहीर झाली आहेत. यात महाराष्ट्रातल्या विविध सेवांमध्ये कार्यरत असलेल्या ५९ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. भारतीय पोलीस सेवेचे अधिकारी, अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक अनुज तारे यांना शौर्यपदक जाहीर झालं आहे. तर अतिरिक्त महासंचालक चिरंजीव प्रसाद, संचालक राजेंद्र डहाळे आणि सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांना परमसेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं आहे.