गोंदिया जिल्ह्यात आज सकाळी एस टीच्या शिवशाही बसला अपघात होऊन ११ जणांचा मृत्यू झाला तर ३३ जण जखमी झाले. ही बस भंडाऱ्याहून गोंदियाकडे चालली होती. वाटेत सडक अर्जुनी मार्गावर बिंद्रावन टोला या गावानजीक चालकाचं नियंत्रण सुटल्याने बस उलटून हा अपघात झाला. पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने धाव घेत बचाव कार्य सुरू केलं. जखमींना गोंदिया जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रजीत नायर यांनी याविषयी सांगितलं.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेविषयी तीव्र शोक व्यक्त केला असून प्रधानमंत्री आपत्कालीन सहाय्य निधीतून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी २ लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या मदत जाहीर केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबांना एसटी महामंडळातर्फे प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे. तसंच, आवश्यकता वाटल्यास जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात यावं आणि त्यांच्यावर शासकीय खर्चातून उपचार केले जावेत, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या अपघाताविषयी तीव्र शोक व्यक्त केला आहे.