झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी एकंदर 1 हजार 609 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत. पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया काल संध्याकाळी संपली. बरकट्ठा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 70 अर्ज दाखल झाले. या पहिल्या टप्प्यासाठी 13 नोव्हेंबरला 43 मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. 28 ऑक्टोबरला उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून, 30 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येतील.
झारखंडमध्ये विधानसभेची निवडणूक दोन टप्प्यात होत आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून राज्याच्या विविध भागात केलेल्या शोधमोहिमेत आतापर्यंत 51 कोटी रुपयांचं अवैध साहित्य आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. तर आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी आत्तापर्यंत सोळा प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्यात आले आहेत.